पाक खोटा; फोटोही खोटा !

0

नवी दिल्ली । संयुक्त राष्ट्रांच्या सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भाषणादरम्यान पाकिस्तानवर केलेल्या आरोपांना पाकिस्तानचे राजदूत मलीहा लोधी यांनी उत्तर देत भारताविरोधातच उलट्या बोंबा मारल्या. यावेळी त्यांनी चक्क पॅलेस्टिनींच्या हल्ल्यात बळी गेलेल्या एका महिलेचे छायाचित्र काश्मीरची महिला म्हणून दाखवत काश्मिरी जनतेवर भारत कशा प्रकारे अत्याचार करीत आहे, हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

भारतावर दहशतवादाचा आरोप
भारताकडून संयुक्त राष्ट्र संघात टेररिस्तान असा उल्लेख करण्यात आल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने ‘भारतच दहशतवादाची जननी’ असल्याचा कांगावा केला आहे. ‘भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे,’ असे राजदूत मलीहा लोधी यांनी म्हटले होते. भारताकडून पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तात्काह प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेतुन घाईगडबडीत काल पाकच्या राजदुतांनी संयुक्त राष्ट्रसंघात भाषण केले. मात्र त्यांचे मुद्ये वस्तुस्थितीपासून लांब होते. तरीही बोलण्याचा अधिकार म्हणून एकप्रकारे पाकने हवी ती बडबड केली.

डाव लोधींवरच उलटला
लोधी यांनी सभेमध्ये खोटी गोष्ट रचत पॅलेट गनच्या मार्‍यामुळे चेहर्‍यावर जखमा झालेल्या महिलेचे छायाचित्र दाखवले आणि म्हटले की, हा भारतीय लोकशाहीचा चेहरा आहे. अशा प्रकारे काश्मिरींवर अत्याचार केले जात आहेत. मात्र, लोधी यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. कारण, 17 वर्षीय राविया अबू जोमा या मुलीचे हे छायाचित्र असून माध्यमांनी हे छायाचित्र अनेकवेळा दाखवले आहे. गाझा पट्ट्यात 2014 मध्ये इस्रायलकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान या मुलीच्या चेहर्‍यावर जखमा झाल्या होत्या. पुरस्कार विजेते छायाचित्रकार हैदी लेविन यांनी रावियाचे हे छायाचित्र काढले होते. यापुर्वीही बर्‍याचदा पाकिस्तानने जगातील प्रमुख देशांची सहानुभूती मिळावी म्हणून फाळणीच्यावेळी झालेल्या करारातील कालबाह्य अटींचा आधार घेत आंतरराष्ट्रीय समुदायापुढे काश्मिरचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यामागे दहशतवादाला पाठबळ देण्याचे धोरण जगाला समजु नये असाच प्रयत्न आहे.

पाकचे जगाला आवाहन
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत बोलताना पाकिस्तानचा बुरखा फाडला. ‘भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यापासून भारताने आयआयटी, आयआयएम, एम्स यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या संस्था उभारल्या. मात्र पाकिस्तानने केवळ दहशतवादी संघटना उभारण्यातच धन्यता मानली,’ अशा कठोर शब्दांमध्ये स्वराज यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला. स्वराज यांच्या या टीकेमुळे पाकिस्तानचा संताप झाला आहे. भारताला रोखण्याचे आवाहन पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्यात आले आहे. ‘दोन शेजारी देशांमधील संघर्ष टळवा, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटत असल्यास त्यांनी भारताला आक्रमक कारवाया कमी करण्याच्या सूचना कराव्यात,’ असा कांगावा पाकिस्तानने केला. दहशतवादाच्या आधारावर काश्मिर प्रश्‍न आंतराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न करायचा आणि स्थानिक पाकिस्तानी जनतेत कौतुकाने मिरवून घ्यायचे अशीच पाकिस्तानातील राजकीय पुढार्‍यांची भूमिका ठरलेली आहे. पाकिस्तानात काश्मिर प्रश्‍न व दहशतवाद हा निवणूकांचा मुद्या बनवून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न करणे एवढाच एकमेव मार्ग राजकारण्यांच्या हातात आहे कारण, पाकिस्तानी राजसत्तेवर लष्कराचे वर्चस्व आहे. ते मोडून काढणे कोणत्याच पाकिस्तानी राज्यकर्त्याला आतापर्यंत शक्य झालेले नाही. म्हणून त्यांना जगापुढेही बोंबा माराव्या लागतात.

कुलभूषण जाधवांचा उल्लेख
कुलभूषण जाधवांसारख्या हेराद्वारे भारत आपल्या देशात दहशतवादाला चालना देत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. नौदलातील निवृत्त अधिकारी असलेले कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसाय करत होते. तेथून पाकिस्तानने त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना हेर ठरवून त्यांच्यावर खटला गुदरण्यात आला. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.