तेहराण: पाकिस्तानी दहशतवाद्यांनी इराण सीमेत घुसखोरी करत असताना इराणच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डसने दिली आहे. इराण रेव्होल्युशनरी गार्डसच्या ग्राउंड फोर्सचे कमांडर मोहम्मद पकपूर यांनी या दहशतवाद्यांना शोधून ठार मारू, असा इशारा दिला आहे. पाकच्या घुसखोर दहशतवादी टोळीने सिस्तान-बलुचिस्तान सीमेजवळ घुसण्याचा प्रयत्न केला.
यावेळी काही इराणी कामगार त्यांच्या समोर आले असता त्यांनी या कामगारांवर बेछूट गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यामध्ये 2 इराणी कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोहचलेल्या कुद्स फोर्सने वेळीच प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नाना घातले. तसेच दोन दहशतवाद्यांना जखमी केले. यानंतर दहशतवाद्यांची टोळी पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने पसार झाली. दहशतवादी हल्ला करणार्या संघटनेचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तरीही बलुचिस्तानच्या या भागात अलकायदासोबत आघाडी असलेली जैश अल-अद्ल ही संघटना सक्रीय आहे. त्यांनीच हा गोळीबार केला असा अंदाज लावला जात आहे. 19 जून रोजीच इराणच्या सुरक्षा रक्षकांनी या संघटनेचा स्थानिक म्होरक्या अंसार अल-फुर्खानला चबहार शहरात ठार मारले होते.