पाचव्या मजल्यावरुन पडून 24 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू

0

मुंबई- सांताक्रुज येथे एका निर्माणधीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून धीरज टेकाम या 24 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला असून साईट सुपरवायझरचा शोध घेत आहेत. सांताक्रुज येथील लिंकिंग रोडवरील सेंट लॉरेन्स स्कूलजवळ एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. याच ठिकाणी धीरजसह इतर काही कामगार कामाला आहेत. 25 मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता धीरज हा इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या लिफ्टमधून सामान घेऊन वरच्या मजल्यावर जात होता. यावेळी पाचव्या मजल्यावर सामान नेत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच तिथे उपस्थित इतर कामगारांनी त्याला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. रुग्णालयातून ही माहिती मिळताच सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघाताला साईट सुपरवायझर जबाबदार असल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. गेल्या महिन्यांत गोरेगाव येथे अशाच प्रकारे रिजू शेर अफगान खान आणि इस्लाम साई या दोन कामगारांचा सातव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर शनिवारी ही घटना घडली. बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना न केल्याने अशा घटना घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.