पाचव्या मजल्यावरून उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू

0

औरंगाबाद । बीएससी बायोकेमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी करतांना पकडला गेल्याने एमआयटी नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी सचिन सुरेश वाघ याने महाविद्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.

न्युट्रीशन बायोकेमिस्ट्री’ विषयाचा पेपर देत असतांना सचिन सुरेश वाघ (19) याला कॉपी करताना पर्यवेक्षकाने पकडले. त्यानंतर त्याला प्राचार्य डॉ. हेलन राणी यांच्यासमोर नेण्यात आले. प्राचार्यांनी सचिनकडून त्याच्या वडिलांचा मोबाईल नंबर मागितला. सचिनने दिलेल्या वडिलांच्या तिन्ही नंबरवर संपर्क होऊ शकला नव्हता. त्यानंतर महाविद्यालयाने हे प्रकरण सचिनकडून लिहून घेत सही घेत, आजचा पेपर देता येणार नसल्याचे प्राचार्यांनी सचिनला सांगितले. सचिनला बाल्कनीत बसवून ठेवले. बाल्कनीचा दरवाजा उघडा असल्यामुळे सचिनने विद्यालय इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात गंभीर जखमी अव्यास्थेमध्ये त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सचिन हा बीएसस्सी प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो हर्सुल येथील नवनाथनगरचा रहिवाशी होता. सचिनच्या वडीलानी या प्रकरणात औरंगाबाद, सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.