पाचशे आणि दोन हजारच्या नोटा बंद करा : चंद्राबाबू नायडू

0

हैदराबाद: पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा बंद कराव्यात, अशी मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. चंद्राबाबू नायडू नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. यामुळेच नायडू यांच्या या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तूर्तास चंद्राबाबू नायडू यांच्या या मागणीवर केंद्राकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ होण्यासाठी पाचशे आणि दोन हजारच्या नोटा बंद करणे गरजेचे आहे. एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याची मागणी सर्व प्रथम केलेला मी एकमेव व्यक्ती होतो. मात्र आता पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटाही बंद करण्याची गरज असल्याचं चंद्राबाबूंनी सांगितलं.

आंध्र प्रदेश पोलिसांनी एका हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. त्याचं उदाहरण देऊन चंद्राबाबूंनी ही मागणी केली आहे. हवाला रॅकेटने 1 हजार 379 कोटी रुपये देशाबाहेर पाठवले. नोटाबंदीनंतर आंध्र प्रदेशसाठी जास्त रक्कम पाठवण्याची मागणी रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली होती. आंध्र प्रदेशला जास्त रक्कम पाठवली जात आहे. मात्र ती कुठे जाते, त्याचा पत्ता लागत नाही, असे उत्तर आरबीआयने त्यावेळी दिले होते. मात्र ती रक्कम कुठे जाते, ते आत्ता माहिती झाले आहे, असे चंद्राबाबू यावेळी म्हणाले.

दरम्यान, नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती. चंद्राबाबू या मुख्यमंत्र्यांच्या समितीचे अध्यक्ष आहेत. कॅशलेस व्यवहार वाढवण्यासाठी केंद्र सरकारला अनेक शिफारसी चंद्राबाबू यांच्या समितीने केल्या आहेत.