पाचशे रुपयांची लाच भोवली : अक्कलकुवा पंचायत समितीचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नंदुरबार एसीबीच्या कारवाईने उडाली खळबळ
नंदुरबार : पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीतील रोहयो विभागातील तांत्रिक सहाय्यक अधिकारी अभिषेक गोपीचंद नुक्ते (33) यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पंचायत समितीत सापळा यशस्वी करण्यात आला.
पाचशे रुपयांची लाच भोवली
27 तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी अक्कलकुवा पंचायत समितीत त्यांच्या आईच्या नावे असलेली एक एकर शेतीत रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी पंचायत समिती अक्कलकुवा येथे अर्ज केलेला होता. या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार 976 रुपये मजुरांच्या खात्यावर टाकण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक नुक्ते यांनी तक्रारदार यांच्याकडून 500 रुपये लाचेची मागणी करून पंचायत समिती कार्यालयातील दालनातच बुधवारी दुपारी साडेबारा वाजता लाच स्वीकारली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर अधीक्षक सतीश भामरे, प्रभारी उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार विजय ठाकरे, हवालदार चित्ते, नाईक मनोज अहिरे, नाईक अमोल मराठे, नाईक संदीप नावाडीकर, महिला नाईक ज्योती पाटील, चालक नाईक महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.