पाचशे वर्षांत पहिल्यांदाच जळगावातील श्रीराम मंदिराला रामनवमीच्या दिवशी कुलूप

0

कुलूपबंद मंदिराच्या बाहेरुनच घेताहेत भाविक दर्शन

जळगाव (किशोर पाटील) : अनेक मोठमोठे संकट आली. अनेकदा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली मात्र अशाही परिस्थितीत जळगावातील ग्रामदैवत असलेले रथचौकातील श्रीराम मंदीर कधी कुलुपबंद नव्हते. पाचशे वर्षांचा इतिहास असलेले हे पुरातन मंदिर एवढ्या वर्षात कोरोनामुळे पहिल्यांदाच कुलुपबंद ठेवण्याची वेळ श्रीराम मंदिर संस्थानवर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे राज्यशासनाचे आदेश आहे. या आदेशामुळे गेल्या पाचशे वर्षात पहिल्यांदाच रामनवमीच्या दिवशी जळगावातील रथचौकातील मंदिर कुलुप बंद ठेवण्याची वेळ श्रीराम मंदिर संस्थानवर आली आहे. आदेशानुसार मंदीर बंद ठेवण्यात आले. मात्र श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते सकाळी विधिवत आरती करण्यात आली. रामनवमी असतांनाही कोरोनामुळे कुलूपबंद मंदिराच्या बाहेरुनच भाविकांनी दर्शन घेतले. तर बंद मंदीराच्या आतुनच मंगेश महाराजांनी दर्शनार्थ आलेल्या भाविकांना ‘सामाजिक अंतर’ ठेवत प्रसादाचे वाटप केले.

एवढ्या वर्षात पहिल्यांदाच मंदिर कुलूपबंद असल्याने याप्रसंगाचे मंगेश महाराज यांनी अतिशय भावनिक पध्दतीने वर्णन केले. महाभारतात ज्याप्रमाणे तुरुंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्याप्रमाणे आज कुलूप बंद मंदिराच्या आतून प्रसाद देण्याची वेळ आली असल्याचा दुर्देवी प्रसंग अोढवला असल्याचे त्यांनी सांगितले.