पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसाठा संपल्याने दोन रुग्णांचा मृत्यू

खासगी डॉक्टरांनी ऑक्सीजन पुरविल्याने इतर रूग्णांचे वाचले प्राण

पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री अचानक ऑक्सिजन पुरवठा संपल्याने एकच खळबळ उडाली. याप्रसंगी रूग्णालयात साधारणतः ३० रूग्ण उपचार घेत होते, त्यापैकी २ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही बाब येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना कळताच त्यांनी रात्री ग्रामीण रुग्णालय गाठले व प्रसंगावधान साधत पाचोरा शहरातील खाजगी डॉक्टरांशी त्वरित संपर्क करून सर्वांना त्यांच्याकडे असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर देण्याची विनंती केली. डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना होकार देऊन सिलेंडर घेऊन जाण्यास सांगितले. त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीला घेऊन अमोल शिंदे यांनी हे ऑक्सीजन सिलेंडर रुग्णालयात आणुन स्वतः रुग्णालयात आतमध्ये पोहोच करून जोडणी केली आणि त्यांच्या प्रयत्नामुळेे उर्वरित रुग्णांचे प्राण वाचले. यासाठी डॉ.आनंद मौर्य, डॉ.भूषण मगर व सागर गरुड, डॉ.पवनसिंग परदेशी व अबुलीस शेख, प्रशासना मार्फत पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी देखील प्रयत्न केले.