रेल्वेमार्ग बोदवडपर्यंत वाढणार ; सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांची माहिती
भुसावळ- गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पाचोरा-जामनेर मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार हा मार्ग बोदवडपर्यंत वाढवण्यात येणार असून पुढे ईगतपुरी-बडनेरापर्यंत रेल्वे गाड्या चालवल्या जातील, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी येथे दिली. शर्मा यांनी शुक्रवारी भुसावळ विभागाचा दौरा केला असता रात्री त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. पाचोरा-जामनेर मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला असून त्यास मंजुरी मिळताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, असेही शर्मा यांनी सांगितले.
भविष्यात ताशी 125 वेगाने धावणार एक्स्प्रेस
रेल्वेने आधूनिकतेची कास धरत प्रवासी हिताला प्राधान्य दिले आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखद व अधिक जलद होण्यासाठी भविष्यात ताशी 125 वेगाने एक्स्प्रेस गाड्या चालवण्यात येणार असून त्या अनुषंगाने शुक्रवारी सरव्यवस्थापकांनी बडनेरा-भुसावळ दरम्यान ताशी 125 वेगाने एक्स्प्रेस चालवण्याची यशस्वी चाचणीही घेतली. मनमाड-इंदौरदरम्यान रेल्वे लाईनचा प्रस्ताव असून बडनेरा-भुसावळ दरम्यान तिसरी लाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती शर्मा यांनी देत ईगतपुरी घाटात तिसरी व चौथ्या लाईनचा प्रस्ताव असून लवकरच त्यास मान्यता मिळाल्यानंतर कामे होणार असल्याचे ते म्हणाले. भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस स्लीपर डबे लावण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देतानाच भुसावळहून सुरतमार्गे मुंबईसाठी लवकरच एक्स्प्रेस चालवण्याबाबत रेल्वे प्रशासन आग्रही असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.