पाचोरा। पाचोरा शहर व तालुक्यात अवैध व्यवसाय बोकाळल्याने गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था, शांतता धोक्यात आली आहे. पोलिसांकडून अवैध धंदे धारकांवर कारवाई होत नसल्याने अवैध धंदे तेजीत आले असून या धंदेवाईकांवर कारवाई न केल्यास तालुका राष्ट्रवादीच्या वतीने 13 जुलै नंतर पोलिस स्टेशच्या आवारात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस निरिक्षकांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरात व तालुक्यात सट्टा, पत्ते, मटका, दारु अवैध वृक्षातोड अवैध वाळु उपसा यासारखे मोठे व्यवसाय वाढीस लागलेले आहेत.
राष्ट्रवादीतर्फे पोलीसांना निवेदन
शहरात अवैध धंद्यामुळे संघटीत गुन्हेगारी वाढली असून सामान्य जनतेला जगणे मुशकील झाले आहे. अवैध जमिनीतून मिळालेल्या पैशातून हाणामारी, खुनासाख्या घटना मागील काळात शहरात घडल्या असून कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याने पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूषण वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षकांनी अवैध धंदे वाईकांवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष मोतीलाल चौधरी, अरुण पाटील, अझहरखान, अशोक मोरे, भगवान मिस्तरी, अॅड दिपक पाटील, अॅड, अविनाश सुतार, उमेश करंडे, गौरव वाघ, हिरामण भोसले, लखन वाघ, राहुल राजपूत, विनोद पाटील यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.