पाचोरा ते पंढरपूर बस त्वरीत सुरू करण्याची मागणी

0

पाचोरा । पाचोरा-भडगाव तालुक्यातील भाविक भक्तांची प्रवासाची सोय व्हावी म्हणून त्वरीत पाचोरा-पंढरपुर बससेवा सुरू करण्यात यावी, यासाठी पाचोरा शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. पाचोरा-भडगाव परीसरातील भाविक फार मोठ्या प्रमाणावर दरवर्षी महाराष्ट्र आराध्य दैवत पंढरपुर येथे विठु माऊलींच्या दर्शनासाठी जात असतात. सर्व भाविक मंडळी हे आमच्याच परीवारातील आहे. त्यांचे दुःख हेच आमचेचं दुःख ही भावना मनात ठेऊन त्यांना प्रवासाची अडचण होऊ नये व सुखरूप प्रवास व्हावा. या शुध्द आणि प्रामाणिक हेतु डोळ्यासमोर ठेवुन म्हणुन हि बससेवा त्वरीत सुरू करावी.

याबाबत शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवरकर व जि.प. सदस्य पदमबापु पाटील, अजय जयस्वाल, एस.टी. कामगार सेना शहरप्रमुख अजय पाटील, अल्पसंख्यांक शहरप्रमुख शेख जावेद, उपतालुकाप्रमुख शरद पाटील, विजय राजपुत, प्रदिप पाटील यांनी याबाबत लेखी निवेदन आगारप्रमुखांचे सहाय्यक ए.टी. बेहेरे यांना देण्यात आले व त्वरीत येत्या 48 तासात बससेवा सुरू करण्याचे आश्वासन आगारप्रमुख यांनी फोनवरून दिले.