विद्यमान चेअरमन अशोक संघवी यांच्या नम्रता पॅनलचा धुव्वा : 18 वर्षांची सत्ता संपुष्टात
पाचोरा: दि. पाचोरा पिपल्स को – आफॅ बँकेच्या आठ संचालकांनी एकत्रीपणे दिलेल्या राजीनाम्यानंतर एक वर्ष प्रशासक राहिलेल्या, दोन वर्ष अगोदरच निवडणूक झाली. यात सुमारे 18 वर्ष सत्तेत असलेल्या अशोक हरकचंद संघवी यांच्या नम्रता पॅनलला एकही जागा राखता आली नाही. तर नवख्या असलेल्या अॅड. अतुल सुभाषचंद संघवी यांना सर्वच्या सर्व जागा निवडुन आणण्यात यश मिळाल्याने बँकेच्या इतिहासात प्रथमच सहकार पॅनलचे वर्चस्व सिध्द झाले आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळीत ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष साजरा केला. निवडणुकी दरम्यान आमदार किशोर पाटील व आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुंकुद बिल्दीकर यांनी सहकार पॅनलची पुर्णपणे प्रचाराची धुरा सांभाळली होती.
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील गोरगरीब व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक कणा असलेल्या पिपल्स बँकेची निवडणूक तीन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र निवडणुकीनंतर चेअरमन अशोक संघवी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अॅड. अविनाश भालेराव, मयुरी मुकुंद बिल्दिकर, प्रा. भागवत महालपुरे, प्रकाश पाटील, विकास वाघ, कल्पना सुधाकर पाटील व राजेंद्र भोसले यांनी दि. 23 ऑक्टोबर 2018 रोजी संचालक पदाचे राजीनामे दिले होते. सुमारे 135 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या बँकेत सभासदांनी राजानामा नाट्यामुळे 50 कोटी रुपयांच्या ठेवी काढुन घेतल्या.
सुमारे सव्वावर्ष बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली होती. त्यानंतर काल दि.12 रोजी बँकेसाठी मतदान झाले होते. आज मतमोजणी झाल्यानंतर बँकेवर सहकार पॅनलने वर्चस्व सिध्द झाले.
सहकार पॅनलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते
सर्वसाधारण जागा- कंसात मिळालेली मते – अॅड. अतुल संघवी (3384), प्रशांत अग्रवाल (3295), अनिल बोहरा (3224), जीवन जैन (3335), देवेंद्र कोटेचा (3345), अविनाश कुडे (3089), प्रकाश पाटील (3268), स्वप्निल पाटील (3351), शरद पाटे (3194), सर्वसाधारण शाखास्थर- पवन अग्रवाल (3744), इतर मागासवर्गीय – प्रा. भागवत महालपुरे, महिला राखीव – मयुरी मुकुंद बिल्दिकर (3844), प्रा. डॉ. अस्मिता पाटील(3442), विमुक्त जाती जमाती – विकास वाघ, अनुसूचित जाती जमाती – अॅड. अविनाश भालेराव (3829)
नम्रता पॅनलचे पराभुत झालेले प्रमुख उमेदवार व त्यांना मिळालेली मते
अशोक संघवी (2234), चंद्रकांत लोढाया (2180), डॉ. झाकीर देशमुख (1676), अल्पेश संघवी (2005), चंद्रकांत येवले (1834), सुभाष नावरकर हे प्रमुख उमेदवार पराभुत झाले असुन अपक्ष उमेदवारांमध्ये अनिल कालिदास येवले (428), विलास ओंकार पाटील (99) विद्यमान संचालक मंडळात प्रा. भागवत महालपुरे, अॅड. अविनाश भालेराव, प्रकाश पाटील, विकास वाघ, मयुरी बिल्दिकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे.
यांनी केली मतमोजणी
मतमोजणी येथील रामदेव लॉन्समध्ये 12 टेबलवर करण्यात आली. याकामी निवडणूक निर्णय अधिकारी के. पी. पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. पाटील, अजित पाटील, दिपक हरी पाटील यांचेसह कर्मचारी भाऊसाहेब महाले, व्ही. के. वाघ, धिरज पाटील, राकेश ठाकरे, योगेंद्र इंगळे यांनी काम पाहिले. तर मतमोजणी आवारात पोलिस उप अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे, गणेश चौबे, विकास पाटील, पोलिस कॉन्स्टेबल नितीन सुर्यवंशी, सुनिल पाटील, किरण पाटील, रामभाऊ चौधरी, गजानन काळे, मुकुंद पाटील, समाधान बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, किशोर अहिरे सह कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त बजावला.