पाचोरा बसस्थानकाचा लुक बदलणार

0

पाचोरा । येथील शिवाजीनगर भागातील बसस्थानकाच्या सर्व सोयी सुविधायुक्त नुतनीकरणाचा प्रस्ताव आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तयार केला आहे. तो प्रस्ताव संबंधीत मंत्री व अधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पाचोरा बसस्थानकाचा लुक बदलणार आहे. शिवाजीनगर भागात राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक व कार्यशाळा आहे. तेथे जागा प्रशस्त नसली तरी त्या तुलनेत आकर्षक बांधकाम झालेले नाही किंवा प्रवाशांसाठी साध्या सोयी सुविधाही नाहीत. पिण्याच्या पाण्यासह प्रवाशांना बसण्यासाठी चांगली सोय नाही. महिला व प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव असून इतर सुविधाही मोडकळीस आल्या आहेत. परिणामी या प्रशस्त जागेत अतिक्रमण वाढत आहे. नियमीत साफसफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. त्याचा प्रवासी व कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन आमदार पाटील यांनी बसस्थानकाच्या नुतनीकरणाच्या प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार अद्यायावत व मॉडेल ठरेल असे देखणे स्थानक लवकर साकारले जाणार आहे.

प्रवाशांची होणार सोय; दोन कोटीचा निधी अपेक्षित
पाचोरा तालुक्याला 128 गावे जोडली आहेत. याशिवाय मराठवाड्याच्या सिमेवरील बहुतांश गावांचा पाचोर्‍याशी संपर्क असतो. त्यामुळे प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. आगारात सुमारे 50 बस असून दिवसभरात त्यांच्या 110 फेर्‍या होतात. खासगी वाहतूक बोकाळली असली तरी आगाराला मिळणारे उत्पन्नही समाधानकारक आहे. मात्र स्थानकात प्रवाशांसाठी असलेल्या सोयी सुविधांची वानवा आहे. आमदार पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांसह डीपीडीसीकडून विविध नाविण्यपुर्ण कामांसाठी भरीव निधी आणुन शहर सौंदर्यात भर घातली आहे. स्मशानभुमी नुतनीकरण, भाजी मंडई, व्यापारी संकुले, भुमिगत वीज केबल, गटारी आदी कामांचा त्यात समावेश आहे. या कामांप्रमाणेच शहरासह तालुक्याचे हृदय ठरलेले बसस्थानकही देखणे व्हावे.