पाचोरा : महाराष्ट्र बँकेचे उपप्रबंधक मिनल महेंद्र कठाणे यांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात कुणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे. यापूर्वी आपण आत्महत्येचे अनेक प्रयत्न केले मात्र आपल्यावर प्रेम करणार्यांनी सांभाळल्याने आपण वाचलो असे त्यांनी नमूद करत जीवन जगण्यापासून आपण आनंदी नाही त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आपले जीवनचक्र हे आधीच संपले होते मात्र केवळ शरीर उरल्याने आपण त्याचा आज त्याग करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. आठ महिन्यांपासून वडिलांनी आपल्याशी बोलणे सोडले, त्यांना मुलापेक्षा अहंकार, अभिमान व गर्व अधिक प्रिय असल्याने त्यांनी आपल्याला समजून घेतले नसल्याचेही चिठ्ठीत नमूद आहे.