पाचोरा येथे खत कारखान्याजवळ ट्रक पेटला

0

सुदैवाने प्राणहानी टळली ; उपाययोजना नसल्याचे उघड

पाचोरा– शहरातील गो.से.हायस्कूलसमोरील गिरड रोडवरील महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्याच्या बाजूला उभ्या असलेल्या रीकाम्या ट्रकला बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने ट्रक जळून खान झाला. या प्रकारानंतर दुसर्‍या ट्रकलाही आग लागली मात्र वेळीच बंब दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने अनर्थ टळला. कारखान्यापासून काही अंतरावरच रेल्वे स्थानक आहे. दरम्यान, खत कारखान्यात आग विझवण्यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना नसल्याचे दिसून आले.

अचानक ट्रकने घेतला पेट
महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाच्या खत कारखान्यात खत भरण्यासाठी बुधवारी सुमारे दहा ट्रक उभ्या होत्या. शहरातील रहिवासी असलेल्या मुनाफ पटेल यांची ट्रकही खते भरण्यासाठी आली होती मात्र दुपारी दोन वाजेच्या सुमारास लागून (ट्रक एम.एच.04 डीडी 3076) ला अचानक आग लागल्याने तिनेे पेट घेतला. त्यातच डिझेलची टाकी फुटल्याने प्रचंड आवाज झाल्याने अनेकांनी धाव घेतली. यावेळी अनेक ट्रक चालक घटनास्थळी हजर नसल्याने ट्रकचे दार तोडून अन्य ट्रक घटनास्थळावरून इतरत्र हलवण्यात आले. याचवेळी ट्रक (एम.एच.18 के 0031) या क्रमांकाच्या ट्रकच्या मागच्या टायर्सने पूर्ण पेट घेतला होता. त्या स्थितीत चालकाने कशीबशी ट्रक खत कारखान्याच्या गेट समोर आणून उभी केली. या ठिकाणी कर्मचार्‍यांनी नळाच्या सहाय्याने पाणी टाकून ही आग विझवली.