पाचोरा येथे जनता रेल्वे कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा

0

पाचोरा । पाचोरा रेल्वे स्थानकावर जलद गती एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, सर्व प्रवासी गाड्या वेळेवर धावाव्यात, भुसावळ-देवळाली शटलची वेळ बदलावी यासह अन्य मागण्यांसाठी पाचोरा तालुका जनता रेल्वे कृती समितीतर्फे आज शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. यात शेकडो रेल्वे प्रवाश्यांसह सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र या आंदोलनाकडे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार व पाचोरा-भडगाव विधानसभेचे आमदार यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांनी पाठ होती याबाबत प्रवाशी व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.

शहरातील शिवाजी पुतळ्यामार्गे रेल्वे स्थानकावर धडकला मोर्चा
जळगाव-भुसावळ हे अंतर हे केवळ 30 कि.मी.चे आहे. तर नाशिकरोड -देवळाली रेल्वे स्थानक 10 कि.मी.चे असतांना येथे सर्व जलदगती गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. त्यातुलनेत जळगाव ते पाचोरा हे अंतर 51 कि.मी. तर चाळीसगाव ते पाचोरा 52 कि.मी.चे अंतर असतांना केवळ जळगाव व चाळीसगाव या रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. याकरीता सचखंड एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस यासह अन्य गाड्यांना पाचोरा येथे थांबा देण्यात यावा. प्रवाशांना चांगली सेवा, सुरक्षितता आणि सुविधा द्यावी, पाचोरा रेल्वे स्थानकावर नविन दादरा तयार करण्यात यावा.

भुसावळ-पुणे एक्स्प्रेस सुरु करावी, पाचोरा रेल्वेस्थानकाला मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळावा, पाचोरा जामनेर नॅरो गेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करावे, महाराष्ट्र एक्सप्रेसच्या बोग्या वाढवाव्या आदी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला सकाळी गांधी चौकापासून सुरुवात झाली. या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी व पाचोरेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोस्टद्वारे लक्षवेध
मोर्चेकरांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा शिवाजी पुतळ्यामार्गे रेल्वे स्थानकावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पाचोरा रेल्वे स्थानक प्रबधंकांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर माजी प्राचार्य डी.एफ. पाटील, अ‍ॅड. मिना पाटील, दिनेश पाटील, ललित पटवारी, अरूण पाटील, राजेंद्र प्रजापत, अ‍ॅड. प्रवीण पाटील, डॉ. रूपेश पाटील, नाना चौधरी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.