पाचोरा । भुसावळ रेल्वे परिमंडळातील पाचोरा रेल्वे स्टेशन हे प्रमुख आहे. मात्र रेल्वे स्टेशनवर अनेक समस्या प्रवाशांना जाणवत आहे. अनेकदा रेल्वे स्टेशनवरील सुविधा पुरविण्याची मागणी शहर वासीयांनी केली. मात्र खासदार ए.टी.पाटील यांनी प्रवाशांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. खासदार पाटील, जनरल मॅनेजर (मुंबई) यांच्यासह भुसावळ व व नागपूर विभागातील लोकप्रतिनिधींची रेल्वे समस्यांसदर्भात नागपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीला खासदार ए.टी. पाटील यांनी हजेरी लावली मात्र पाचोरेकरांच्या समस्या मांडण्यास ते असमर्थ ठरले आहे. पाचोरा येथे रेल्वे स्टेशनवर गाड्यांना थांबा मिळण्यासाठी ग्राहक सेवा संघ पाचोरा – भडगाव नेहमी पाठपुरावा करत असते. 26 एप्रिल रोजी पाचोरा तालुका जनता रेल्वे कृती समितीचा मोर्चा पाचोरा रेल्वे स्टेशनवर काढण्यात आला.
सचखंड एक्सप्रेसने सिंधी समाज बांधव बियास या पवित्र तिर्थक्षेत्राला जात असतात. नांदेड येथे शिख समाजाचे श्रद्धास्थान आहे. औरंगाबाद येथे जाण्यासाठी नांदेड हनुरसाहेब सचखंड एक्सप्रेस गरजेची आहे. तसेच मुंबईला जाण्यासाठी महानगरी एक्सप्रेसला पाचोर्यात थांबा मिळणे फार गरजेचे आहे. विदर्भ एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच पाचोरा- जामनेर ब्रॉडगेजचे विस्तारीकरण मलकापूर पर्यंत व्हायला हवे आदी मागणी पाचोरेकरांनी केली आहे. रेल्वे प्रवाशी संघटनेने देखील आमदार, खासदार, डी.आर.एम. भुसावळ यांना निवेदने दिली आहेत. ग्राहक सेवा संघाने रेल्वे बोर्ड नवी दिल्ली, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे रेल्वेच्या सुविधेबाबत मागणी केली आहे. आमदार किशोर पाटील यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची पाचोर्याच्या रेल्वे समस्या संदर्भात भेट घेतली होती. मात्र खासदार ए.टी. पाटील हे केंद्रात असून रेल्वेबाबत समस्या मांडण्यात असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.