पाचोरा:- शहरातील भडगाव रोड भागातील विवेकानंद नगरातील रहिवासी व सध्या छत्तीसगड येथे आईटीबीपी या सुरक्षा यंत्रणेत कर्तव्यावर असलेल्या गणसिंग राजपूत (पाटील) या जवानाचा छत्तीसगड येथे मृत्यू झाला. या जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात आले असले तरी नेमकी घटना कशी घडली वा मृत्यू कशामुळे झाला ? हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.
गणसिंग राजपुत हे 2000 मध्ये आयटीबीपीमध्ये चालक म्हणून भरती झाले होते. बेळगावहून त्यांची दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या राजनंदन कॅम्पमध्ये बदली झाल्याने ते तेथे हजर झाले होते. राजपूत यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व सात वर्षांचा एक मुलगा आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त कळताच विवेकानंद भागात शोककळा पसरली. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत जवानाचा मृतदेह पाचोरा येथे आणला जाण्याची शक्यता आहे. सैन्याचे सुभेदार आल्यानंतरच मृत्यूचे ठोस कारण कळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.