पाचोरा: पाचोरा येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. रुग्णांचा रहिवास असलेला परिसर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी प्रतिबंधित केला असून या भागातील नागरीकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. प्रशासनाने समर्थ लॉन्स, सारोळा रोड ही इमारत ताब्यात घेण्यात आलेली असून तीव्र लक्षणे असणार्या रुग्णांना विघ्नहर्ता इस्पितळात दाखल करण्यात येत आहे. भागवान मोहल्ला, समर्थ लॉन्स व शक्तिधाम या वेगवेगळ्या स्थळांचे ठिकाणी अनुक्रमे नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, सहाय्यक गटविकास अधिकारी विलास सनेर व नायब तहसिलदार संभाजी पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
मयत व्यक्तीचा मृत्यूपूर्वी १३ लोकांशी संपर्क
पाचोर्यात सापडलेला पॉझीटीव्ह रुग्ण व मालेगावचे भौगोलिक सानिध्य यामुळे कोरोनाग्रस्तांची वाढ होऊ नये यासाठी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे व उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. अतितातडीची गरज असल्याखेरीज कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे. यादरम्यान मयत व्यक्तीचा मृत्यूपूर्वी एकूण १३ लोकांशी संपर्क आला होता. त्याबाबत सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे व संसर्गाच्या तीव्रतेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव अथवा पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, असे आवाहन तहसिलदार कैलास चावडे यांनी कळविले आहे.