पाचोरा- शहरातील महाराणा प्रताप चौकासमोर भरधाव स्कूल बसने दुचाकीला धडक दिल्याने आमडदे येथील ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला तर अपघातानंतर अज्ञात स्कूल बस चालक वाहनासह पसार झाला होता मात्र काही वेळानंतर पेालिसांनी त्यास ताब्यात घेतले. जगन्नाथ बी.सोनवणे (56, मूळ रा.कळमडू-पोहरे) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते भडगाव तालुक्यातील आमडदे येथे ग्रामसेवक म्हणून कर्तव्यावर होते. काम संपवून ते पाचोर्यात आले असता निर्मल उद्यानालागत निर्मल इंटरनॅशनल स्कूलची बस (एम.एच.19 वाय.6193) ने सोनवणे यांच्या दुचाकी (एम.एच.19 ए. एफ.3952) ला धक्का दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामसेवक समाधान दिनकर सूर्यवंशी (37, पाचोरा, राजीव गांधी कॉलनी) यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर बस चालक बापू पूजारीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. काँग्रेस आयचे पदाधिकारी सचिन सोमवशी यांनी घटनास्थळी धाव घेत मृत शवविच्छेनासाठी हलवण्याकामी सहकार्य केले. अपघातानंतर मयताची पत्नी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.