पाचोर्‍यात हुबळी एक्स्प्रेसचा अपघात टळला : दोन म्हशींसह गायींचा मृत्यू

0

धडकेनंतर इंजिनानजीकची बोगी उतरली रूळाखाली : भुसावळ विभागात सलग तिसर्‍या दिवशी अपघात

भुसावळ (गणेश वाघ)- अप वाराणसी-हुबळी एक्स्प्रेसच्या इंजिनासमोर आल्याने दोन म्हशींसह गायीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेत मृत जनावरांमुळे इंजिनाला लागून असलेली बोगी रेल्वे रूळाखाली उतरली मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर हायड्रोलिक जॅकने ही बोगी पुन्हा रूळावर आणण्यात यश आल्यानंतर दुसरे इंजिन जोडून मुंबईकडे गाडी रवाना करण्यात आली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून भुसावळ रेल्वे अपघाताची मालिका सुरू असून या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

इंजिनासमोर जनावरे आल्याने अपघात
अप वाराणसी-हुबळी एक्स्प्रेस पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ आली असताना इंजिन (डब्ल्यूएपी 4-20021) समोर दोन म्हशींसह गाय आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर जनावरे इंजिनाला धडकेला इंजिनाला लागून असलेली बोगी (क्रमांक 14722) ची चाके रेल्वे रूळाखाली उतरली. या प्रकारानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये घबराटही पसरली. भुसावळ रेल्वे विभागाला अपघाताची माहिती कळवल्यानंतर अ‍ॅक्सीडंट रीलिफ व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आली. हायड्रोलिक जॅकच्या पद्धत्तीने रेल्वे रूळाखाली घसरलेली चाके पुन्हा रूळावर आणण्यात यंत्रणेला यश आल्यानंतर सुमारे दिड तासांच्या विलंबानंतर ही गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली.

तीन दिवसांपासून अपघाताची मालिका
भुसावळ विभागात गेल्या तीन दिवसांपासून अपघातांची मालिका कायम आहे. तीन दिवसांपूर्वी अप पाटलीपूत्र एक्स्प्रेसचे इंजिनला बोगीला लागत असताना अप आऊटरजवळ रेल्वे रूळाखाली घसरली होते तर यामुळे तब्बल पाच तास विलंबाने ही गाडी मुंबईकडे रवाना झाली होती तर अन्य तीन गाड्यांनाही सुमारे दोन तास विलंब झाला होता तर रविवारीदेखील रेल्वे यार्डातील लॉबी कॅबिन क्रमांक 10 ते 11 मध्ये रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास नागपूरकडून भोईसरकडे जाणार्‍या मालगाडीची एक बोगी (बोस्ट-एचएसएम 19140452471) रेल्वे रूळाखाली उतरली होती. ही घटना कॅबिन यार्डमध्ये घडल्याने सुदैवाने रेल्वे वाहतुकीवर परीणाम झाला नव्हता मात्र सातत्याने तीन दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली आहे.