पाच गावठी कट्टे, दहा जिवंत काडतुसांसह आरोपी संयुक्त कारवाईत जाळ्यात

जळगाव : गावठी कट्ट्यांची तस्करी करणार्‍यांसह त्याची बेकायदा खरेदी करणार्‍यांबाबत यंत्रणेला टीप मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. चोपडा ग्रामीण हद्दीतील बोरअजंटी फॉरेस्ट नाक्याजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसहा संशयीत आल्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर अन्य दोघे पसार झाले. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकासह जळगाव स्थानिक गुन्हे शाखा तसेच चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन पथकाने ही संयुक्त कारवाई केली. दोघा संशयीतांकडून पाच गावठी कट्टे, दहा जिवंत काडतूस, चारचाकी वाहन तसेच मोबाईल मिळून सहा लाख 80 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

या आरोपींना केली अटक
गावठी कट्ट्याची बेकायदा खरेदी करणार्‍या मयूर काशीनाथ वाकडे (रा.अरुण नगर, चोपडा) व अक्रम खान शेरखान पठाण (हरसुल, औरंगाबाद) या दोघांना अटक करण्यात आली तसेच अरुण नवनाथ सोनवणे (पुणे, निगडी) तसेच गावठी कट्टा विक्री करणारा संशयीत लाखनसिंग मोहसिंग बरणालारा (रा.पार उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) अशी पसार आरोपींची नावे आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
नाशिक आयजींच्या विशेष पथकातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहोम, एपीआय सचिन जाधव, एएसआय बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाणे, सचिन धारणकर, प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे व एलसीबीचे हवालदार संदीप पाटील, नाईक प्रवीण मांडोळे, दीपक शिंदे, चोपडा ग्रामीणचे हवालदार सुनील जाधव, शिंगाणे, राकेश पाटील आदींच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.