पुणे । जिल्ह्यातील पाच तालुके अद्याप तहानलेलेच आहेत. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू आहे. अनेक गांवात टँकरने पाणीपरवठा केला जात आहे. पुरंदर, दौड, बारामती, इंदापुर आणि शिरूर तालुक्यातील 79 हजार लोकांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.
पुरंदर सर्वाधिक टँकर
पुरंदर तालुक्यातील 8 गावे आणि 151 वाड्यांमध्ये सर्वाधिक 19 टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल बारामती तालुक्यातील 9 गावे आणि 126 वाड्यां-वस्त्यांवर 11 टॅँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. त्यानंतर दौंड तालुक्यातील 2 गावे आणि 8 वाड्यांवर 2 टॅँकरने, तर इंदापुरातील एका गावात एक टॅँकर आणि शिरूर तालुक्यातील 1 गाव व 4 वाड्यांवर एक टॅँकरच्या माध्यामातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाण्यासाठी वणवण
ऐन पावसाळ्यातही जिल्हा प्रशासनाला टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातच मागील 15 दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यातील निम्मी धरणे अद्याप भरणे बाकी आहेत. त्यामुळे पुढील दहा महिन्यात या पाच तालुक्याबरोबर इतर तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागण्याची चिन्हे आहेत.
पावसाची दडी
आंबेगाव, भोर, वेल्हा, हवेली, जुन्नर, खेड या तालुक्यांतील गावांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे येथील टॅँकर जून महिन्याच्या अखेर बंद करण्यात आले. तर यावर्षी मावळ आणि मुळशी तालुक्यात एकही टॅँकरची गरज लागली नाही. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर या तालुक्यात पावसाने दडी मारल्याने येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.