पाच तासात दरोड्याची उकल, आठ आरोपी जाळ्यात

0

पाचोरा कौतुकास्पद पोलिसांची कामगिरी ; चाळीसगाव, पाचोर्‍यासह मालेगावातील आरोपी

पाचोरा– ऑनलाईन पार्सलची भडगाव येथे डिलेव्हरी करून पाचोर्‍याकडे परतणार्‍या डिलेव्हरी बॉयच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दुचाकीवरून आलेल्या सहा चोरट्यांनी 64 हजारांची रोकड तसेच 35 हजार रुपये किंमतीचे पार्सल लांबवल्याची घटना शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास पाचोरा-भडगाव रस्त्यावरील बांबरूड फाट्यावर घडली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोर्‍याचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासात आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत तर तीन आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. अवघ्या पाच तासात गुन्हा उघड करणार्‍या पाचोरा पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाचे समाजमनातून कौतुक होत आहे.

पाळत ठेवून दरोड्याचा संशय
तक्रारदार आशिष पटवारी (33, आठवडे बाजार, पाचोरा) हे भडगाव बसस्थानकात पार्सलची डिलेव्हरी देत असताना आरोपींनी पाळत ठेवली. सहा आरोपी दोन दुचाकींवर तर अन्य तीन आरोपी ओमनी वाहनाने दुचाकीचा माग काढत बांबरूड फाट्यापर्यंत पोहोचले. पटवारी यांना दुचाकी थांबवण्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी दुचाकी न थांबवल्याने त्यांच्या वाहनापुढे दुचाकी लावत त्यांना खाली पाडून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आरोपींनी रोकड व पार्सल लांबवत पोबारा केला.