पाच दरोडेखोर भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कोम्बिंगदरम्यान धाडसी कारवाई : पाच संशयीतांकडून दरोड्याचे साहित्य जप्त
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील गोलाणी कॉम्लेक्सजवळील पुलाजवळ गावठी कट्ट्यासह घातक शस्त्रांद्वारे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. संशयीतांच्या ताब्यातून दरोड्याचे साहित, गावठी कट्टा, चाकू, मोबाईल व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
या आरोपींना पोलिसांकडून अटक
अफाक अख्र पटेल (26, खडका रोड), सोमेश भगवान सोनवणे (28, राकानगर, भुसावळ), नावेद शेख शकील शेख (20, ग्रीन पार्क, भुसावळ), जितू पप्पू पिवाल (28, वाल्मिक नगर, भुसावळ) व अन्य एका अल्पवयीन आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
कोम्बिंगमुळे अडकले दरोडेखोर
धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व भुसावळ पोलीस उपविभागात कोम्बिंग राबवण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षकांनी दिले होते. या अनुषंगाने पोलिसांकडून मोहिम राबवली जात असताना नॅशनल हायवेवरील गोलाणी कॉम्प्लेक्सजवळील ब्रिज परीसरात काही संशयीत दरोड्याच्या पूर्व तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर सापळा रचून संशयीतांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस नाईक यासीन पिंजारी, पोलिस नाईक रमण सुरळकर यांच्यासह आरसीपी पथकातील स्टाफने केली.
दरोड्याचा डाव उधळला : शस्त्र जप्त
संशयीत पोलिस आल्यानंतर पळू लागताच पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. संशयीताच्या ताब्यातून एक देशी कट्टा व चाकू जप्त करण्यात आला तसेच दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात भादंवि 399, 402 कलम 03/25 शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.