पाच नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी ‘तारीख पे तारीख’

0

नगरसेवकांनी मांडली बाजू ; 6 रोजी पुढील सुनावणी

जळगाव: तत्कालीन जळगाव नपाच्या बहुचर्चित घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात धुळे विशेष न्यायालयाने आजी-माजी नगरसेवकांना शिक्षा सुनावली आहे. यातील विद्यमान नगरसेवक सदाशिव ढेकळे, भगत बालानी, कैलास सोनवणे, लता भोईटे, दत्तात्रय कोळी यांना अपात्र करण्याबाबत दीपक गुप्ता यांनी तक्रार केली होती.त्यानुसार मनपा प्रशासनाने म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली होती. 17 डिसेंबरला सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते.त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देवून 30 डिसेंबरला सुनावणी ठेवण्यात आली.त्यानुसार आज सुनावणी होती.मात्र पुन्हा ‘तारीख पे तारीख’ देत 6 जानेवारी सुनावणीसाठी मुदतवाढ देण्यात आली.दरम्यान,आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्यासमोर पाचही नगरसेवकांनी बाजू मांडली.

घरकुल प्रकरणात शिक्षा सुनावलेल्या पाच विद्यमान नगरसेवकांच्या अपात्रतेप्रकरणी सदाशिव ढेकळे , भगत बालानी यांनी लेखी स्वरुपात म्हणणे मांडले. तर कैलास सोनवणे, लता भोईटे आणि दत्तात्रय कोळी यांनी मौखिक बाजू मांडून वकीलाद्वारे बाजू मांडण्यासाठी मुदकवाढ द्यावी अशी विनंती केली.त्यानुसार तीन नगरसेवकांना बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून 6 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. भगत बालानी व सदाशिव ढेकळे यांना आयुक्तांनी अपात्रतेसाठी म्हणणे मांडण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात न्यायालयात अपील दाखल केले असून 13 रोजी सुनावणी होणार आहे.त्यामुळे स्थगिती द्यावी अशी मागणी केली. यावेळी मनपाचे विधीसल्लागार आनंद मुजुमदार उपस्थित होते.