पुणे : परदेशातून पाच लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याने राज्यातील साखर कारखानदारीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कारखान्यांची साखर विक्री सध्या मंदावली आहे. कारखानदार सध्या क्विंटलमागे 50 ते 100 रुपयांचा तोटा सहन करत साखरेची विक्री करत आहेत. केंद्राच्या या निर्णयावर राज्यातील कारखानदारांसह ऊसउत्पादक नाराजी व्यक्त करत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या हंगामात साखर उद्योगाला ‘अच्छे दिन’ आले होते. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल 400 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे साखर कारखान्यांनी वाढलेल्या दराच्या पैशांचा उपयोग गेटकेन ऊस मिळविण्यासाठी केला होता. जानेवारीत पंजाब आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार अधिकच संवेदनशील झाले होते. घाऊक बाजारपेठेत साखेरचे दर 40 रुपयांवर गेल्याने साखर कारखान्यांची शिखर संघटना असलेल्या इस्मावर बडगा उगारला होता. मात्र, साखरेचे दर आवाक्यात येत नसल्याचे निदर्शनास आल्याने केंद्राने 5 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील अनेक कारखान्यांनी याची धास्ती घेतली आहे. कच्ची साखर आयात होताच साखरेचे दर पडतील, अशी भीती अनेक कारखान्यांना वाटते आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांनी 50 ते 100 रुपयांनी दर कमी करत साखरविक्रीचा सपाटा लावला आहे. 12 जूनच्या आत साखर आयात केल्यास साखरेचा आयातकर माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यंदा देशातील साखरेचे उत्पादन अंदाजे 2 कोटी 3 लाख टनाच्या आसपास होण्याची शक्यता आहे. मात्र, देशाची साखरेची गरज ही 2 कोटी 40 लाख टन इतकी आहे. देशात गेल्या हंगामातील 77 लाख टन साखर शिल्लक आहे. शिवाय, उत्पादित 2 कोटी 3 लाख टन अशी मिळून 2 कोटी 80 लाख टन साखर शिल्लक असताना केंद्राने 5 लाख टन कच्ची साखर आयात करण्याची काय गरज होती, असा सवाल कारखानदार आणि ऊसउत्पादक शेतकरी करत आहेत.
ही आयात केलेली कच्ची साखर 12 जूनपर्यंत देशात येणार आहे. त्यावर प्रक्रिया करून ती साखर प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लोटणार आहे. सध्या तरी साखर कारखान्यांना या साखरेची भीती नसली, तरी भविष्यात राहणार आहे.
राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशातील व्यापारी महाराष्ट्रातील साखर उचलत होेते. मात्र उत्तर प्रदेशातील मधील साखर कारखाने अजूनही सुरू असून, त्या राज्यांत साखरेचे उत्पादन जादा झाल्याने तेथील कारखान्यांनी महाराष्ट्रापेक्षा क्विंटलमागे 50 ते 100 रूपये दर कमी करून साखरेची विक्री सुरू केली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील व्यापार्यांना उत्तर प्रदेशवरून साखरेची वाहतूकही कमी आणि दरही कमी यामुळे व्यापार्यांनी उत्तर प्रदेशातून साखर उचलण्यास सुरूवात केली आहे. आयात साखरेमुळे साखरेचे दर पडतील, या भावनेतून व्यापारी सध्या साखर खरेदी करण्याचे टाळत आहेत.
केंद्राने साखर आयातीपेक्षा गेल्या वर्षी ज्याप्रमाणे कोटा पद्धत ठरवून दिली होती, त्याप्रकारे कोटा पद्धत ठरवून द्यावी. त्यास आमची काहीच हरकत नव्हती. साखर आयात केल्याने याचा फटका साखरेच्या दरावर होणार आहे. त्यामुळे कोटा पद्धत ठरवून द्या, अशी मागणी कारखानदार करत आहेत.