हडपसर/पुणे : मुलगा नसल्यामुळे सर्वांकडून टोचून बोलण्याच्या रागातून पाच वर्षांच्या सख्या पुतण्याचा काकूनचे गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या काकूने तो हरवल्याचा बनाव रचला आणि अश्रू्रही ढाळले. पण, पोलिसांनी चोवीस तासांत अपहरणाचा गुन्ह्या उघडकीस आणत या काकूला अटक केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे पूर्ण शहर हादरुन गेले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माऊली विनोद खांडेकर (वय 5 वर्ष, काळेपडळ, हडपसर) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची काकू अनिता शाम खांडेकर (वय 32, रा. हडपसर) हिस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी माऊलीचे वडिल विनोद खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिताला चारही मुली आहेत. त्यामुळे सासरची मंडळी सतत टोचून बोलत असत. तसेच, तिच्यासह मुलींवर चिडचिड करत असत. खांडेकर कुटुंबात तीन भाऊ आहेत. त्यात आरोपी काकू सर्वार्ंत मोठी आहे. तिघा भावांत मोठ्या दोघांना फक्त मुलीच आहेत. पण, सर्वात लहान जावेलाच माऊली हा एकूलता एक मुलगा होता. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्याचे लाड केले जात असत. अनिताच्या मुलींचे कोणी लाडही करत नसत. उलट त्यांच्यावर सतत चिडचिड केली जात असे. त्यामुळे आरोपी अनिता बेचैन होती. तिला याचा राग येत होता. या रागातूनच तिने माऊलीचाच काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार, गुरुवारी माऊलीला घेऊन अनिता आपल्या खोलीत गेली. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. तसेच, मृतदेह घरातील कॉटखाली ठेवला.
ड्रममध्ये सापडला मृतदेह
बराच वेळ झाल्यानंतरही माऊली दिसत नसल्याने घरातील मंडळींनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोन ते अडीच तास कुटुंबीयांनी माऊलीचा शोध घेतला. कुटुंबीय परिसरात त्याचा शोध घेत असताना काकूने संधी साधली. त्या वेळेतच तिने घरामागे असणार्या पाण्याच्या ड्रममध्ये माऊलीचा मृतदेह टाकला. त्यानंतर काकूनेच माऊली हरवल्याच्या भावनेतून अश्रू ढाळण्यास सुरुवात केली. माऊली मिळत नसल्याने शेवटी कुटुंबीयांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन घटनेची माहिती दिली. कुटुंबीय व पोलिस माऊलीचा शोध घेत होते.
सीमकार्डमुळे लागला तपास
दरम्यान, शेजारी राहणार्या एका महिलेचे सीमकार्ड दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेले होते. त्याच सीमकार्डवरुन माऊलीच्या वडिलांना निनावी फोन आला. तसेच, माऊली जेजुरी रेल्वे स्टेशनवर असल्याचे या फोनवरून त्यांना सांगण्यात आले. कुटुंबीय व पोलिस जेजुरीला गेल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने प्लॅन रचला. पण, पोलिसांनी आलेल्या फोनची माहिती काढली. त्यावेळी तो याच परिसरातून आल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी माहिती घेतली. याच सीमकार्डवरून दीड महिन्यांपूर्वी अनिताने भावालाही फोन केल्याचे तपासात दिसून आले. त्यामुळे अनितानेच माऊलीचा खून केल्याचा सशंय पोलिसांना आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने आपणच माऊलीचा खून केल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंजूम बागवान, सहायक निरीक्षक हेमंत पाटील, संतोष तासगावकर व त्यांच्या पथकाने 24 तासांत खुनाची घटना उघडकीस आणली.
खूप दिवसांपासून नियोजन?
आरोपी अनिताने दोन महिन्यांपूर्वी घरा शेजारी राहणार्या महिलेचे सीमकार्ड चोरले होते. हा प्रकार कोणालाही माहिती नव्हता. त्यामुळे तिने या खुनाचे नियोजन खूप दिवसांपासूनच केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.