पाच वर्षांत अमित शहांच्या श्रीमंतीत 300 टक्के वाढ

0

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संपत्तीत पाच वर्षात 25 कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तब्बल 300 टक्क्यांनी वाढली आहे. गुजरातमधून राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत व काँग्रेसचे अहमद पटेल यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली.

शहांची जंगम मालमत्ता 19 कोटी रूपये
2012 मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून शाह दाम्पत्याकडे 8 कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती होती. 2017 मध्ये ती 34 कोटी 31 लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये जंगम मालमत्ता 1 कोटी 91 लाख रुपयांवरुन 19 कोटी रुपये झाली. शाह दाम्पत्याच्या मालमत्तेमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. शाह यांनी वार्षिक उत्पन्न 1 कोटी 49 लाख रुपये असल्याचे दर्शविले आहे.

बलवंतसिंह राजपूत सर्वाधिक श्रीमंत
काँग्रेसमधून भाजपत येणारे बलवंतसिंह राजपूत हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 300 कोटींहून जास्त रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली असून, पटेल दाम्पत्याचे वार्षिक उत्पन्न 35 कोटी 20 लाख रुपये आहे. 2011 च्या तुलनेत पटेल यांच्या संपत्तीमध्ये 123 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पटेल दाम्पत्याकडे 8 कोटी 15 लाख रुपयांची संपत्ती आहे.

स्मृती इराणींचे बीकॉम पूर्ण नाही
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील राज्यसभेसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती व शिक्षणाविषयी खुलासा केला आहे. इराणी दाम्पत्याकडे 8 कोटी 84 लाख रुपयांची संपत्ती असून, त्यांच्यावर 21 लाखांचे कर्ज आहे. बीकॉम पूर्ण केले नसल्याचे स्मृती इराणींनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट नमूद केले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दूरस्थ शिक्षण पद्धतीने बीकॉमच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण पूर्ण केल्याचे नमूद केले होते. यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणींनी थेट उल्लेख केलेला नाही.

अमित शाह होणार संरक्षण मंत्री?
अमित शाह हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होण्याची शक्यता आहे. शाह यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी अर्ज भरला असल्याने त्यांची केंद्रीय मंत्रिपदासाठी निवड होऊ शकते. शाह यांना केंद्रीय गृहमंत्रिपद किंवा संरक्षणमंत्रिपद देण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही अनुकूल असल्याचे समजते.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. तेव्हापासून संरक्षणमंत्रिपदाचा अतिरिक्त भार अरुण जेटली यांच्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संघानेही शाह यांच्या नावाला संमती दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले. पुढच्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारातच शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.