पाच वर्षांत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाने घटली

0

मुंबई : गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाने घटली आहे, अशी माहिती प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रजा फाउंडेशन या एनजीओकडून दरवर्षी माहिती अधिकारातून मिळवलेल्या आकडेवारीवरून अहवाल प्रसिद्ध केला जातो. यावर्षीही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबतचा अहवाल प्रजा फाउंडेशनने मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्ध करण्यात आला.

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या अशीच राहिली तर 2027-28 मध्ये पालिकेच्या शाळांमध्ये एकही विद्यार्थी राहणार नाही असे म्हटले आहे. 2017-18 मध्ये पालिकेच्या 426 शाळांमध्ये 100 हुन कमी विद्यार्थी आहेत. गेल्या दहा वर्षांत विद्यार्थी नसल्याने किंवा विद्यार्थी कमी असल्याने 229 शाळा बंद पडल्या आहेत. ज्यामध्ये 48 टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, तर 39 टक्के शाळा गुजराती, तमिळ, तेलगू आणि कन्नड माध्यमांच्या असल्याचे म्हटले आहे.पालिका शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये पालक, शिक्षक आणि स्थानिक नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र नगरसेवक या समितीच्या बैठकांना अनुपस्थित राहत असल्याने शाळांचे अनेक प्रश्‍न सुटू शकत  नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

नगरसेवकांना मिटिंगची माहितीच नसते

पालिकेच्या शाळांमध्ये व्यवस्थापन समिती नेमली जाते. मात्र या समितीच्या बैठकीची माहिती नगरसेवकांना दिलीच जात नाही. गेल्या दोन वर्षांत मला असे कुठलेही निमंत्रण आलेले नाही. प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेला अहवाल काही अंशी योग्य आहे मात्र तो सर्वच बरोबर आहे असे नाही. नागरिकांची मानसिकता इंग्रजी शाळांची असल्याने मराठी व इतर भाषिक शाळा बंद पडत आहेत. त्याच वेळी पालिकेने सुरू केलेल्या एमपीएस शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिली.