पाच वर्षांपासून वसतिगृहाचे काम अपूर्णच

0

अलिबाग । जिल्हा रुग्णालयात सुरू असलेले परिचारिका अभ्यासक्रम आणि वसतिगृहाच्या इमारतीचे काम 5 वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. इमारतीसाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, ठेकेदाराने हे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. जिल्हा रुग्णालयात परिचारिका अभ्यासक्रम कोर्स शासनातर्फे घेतला जातो. त्याचबरोबर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा जिल्हा रुग्णालयात करण्यात येते. मात्र, जिल्हा रुग्णालयात पूर्वी परिचारिका अभ्यासक्रम सुरू असलेली इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शासनाकडे नव्या इमारतीच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार शासनाने नव्या परिचारिका अभ्यासक्रम आणि हॉस्टेल इमारतीसाठी निधींची तरतूद केली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये परिचारिका अभ्यासक्रम आणि हॉस्टेलची नवी इमारत तळमजला व दोन मजले अशी रचना करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या जुनी ओपीडी सुरू असलेल्या इमारतीच्या जागेवर ही इमारत प्रस्तावित केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढून या कामाची वर्क ऑर्डर 27 ऑगस्ट 2013 रोजी सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीस मंजूर केली. परिचारिका अभ्यासक्रम आणि हॉस्टेलसाठी 2 कोटी 20 लाखांची सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीस वर्क ऑर्डर देण्यात आली. सदर इमारतीचे काम दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या इमारतीचा 24 महिन्यांचा कालावधी उलटून जाऊन पुढील 2 वर्षे उलटले. तरी, काम अजून अपुरेच राहिलेले आहे.

आतापर्यंत 2 कोटी 20 लाखांपैकी 1 कोटी 4 हजारांचे काम पूर्ण झाले असल्याचे समजते. ठेकेदारस हे बिल अदा केले आहे, असे सार्वजनिक बांधकामाचे सहाय्यक यांनी सांगितले. त्याचबरोबर ठेकेदारास काम करताना रेतीची समस्या उद्भवल्याने काम अपुरे राहिले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.जिल्हा रुग्णालयात परिचारिकाअभ्यासक्रम कोर्ससाठी दरवर्षी 40 ते 50 विद्यार्थी प्रवेश घेतात. याच हेतूने नव्या इमारतीमध्येच अभ्यासिका वर्ग आणि हॉस्टेल सुविधा करण्यात येणार आहे. मात्र, शासनाने या इमारतीसाठी निधीची तरतूद करूनही ठेकेदारामुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम अजून अपुरेच राहिलेले आहे. सदर इमारतीच्या अपुर्‍या राहिलेल्या कामास जेवढा ठेकेदार जबाबदार आहे. तेवढेच, सार्वजनिक बांधकाम विभागही जबाबदार असल्याची ओरड सर्वच थरातून होऊ लागली आहे.

काम पूर्ण करण्याची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या हाकेवर सदर इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या कामाचा कालावधी निघून गेला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम पूर्ण करण्याबाबत विचारणा का केली नाही, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचे दिसते. त्यामुळे परिचारिका अभ्यासक्रम आणि हॉस्टेल इमारतीचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. जिल्हा रुग्णालयात सुरू असलेले परिचारिका अभ्यासक्रम आणि हॉस्टेल इमारतीचे काम 2 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही इमारतीचे काम रखडलेलेच आहे. इमारतीचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.