पाच वर्षात 24 शेतकरी आत्महत्या

रावेर तालुक्यातील प्रकार : सहाच कुटुंबापर्यंत पोहोचली शासनाची उभारी योजना

रावेर (शालिक महाजन) : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी घेरल्याने हतबल झालेल्या तब्बल 24 शेतकर्‍यांनी आत्महत्या करीत जगाचा निरोप घेतल्याच्या घटना तालुक्यात गेल्या पाच वर्षात घडली. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी अवघ्या सहा शेतकर्‍यांपर्यंत शासनाची उभारी योजना पोहोचली आहे.आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पीडीत कुटुंबाला जगण्याने बळ मिळावे म्हणून नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची ही महत्वकांशी योजना आहे.

शेतकर्‍यांनी कवटाळले मृत्यूला
गेल्या पाच वर्षांत अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ अशा विविध कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान होणे, शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास नष्ट होणे आदी घटनांचे सातत्य व त्यामुळे शेतकर्‍यांना कर्ज फेडण्यासह पुढील हंगामाची तयारी करणे यासाठी आर्थिक विवंचना वाढत असल्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडण्याच्या प्रमाणता वाढ झाली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची त्यामुळे होणारी दैनावस्था, उपासमार प्रत्येकालाच दुःखदायी होत असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना जगण्याचे बळ मिळावे या हेतूने विभागीय आयुक्त गमे यांनी उभारी योजना सुरू केली.

पाच वर्षात 24 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
रावेर तालुक्यात 2015 मध्ये नऊ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली तर 2016 मध्ये एक, 2017 मध्ये सात, 2018 मध्ये तीन, 2019 मध्ये एक तर 2020 मध्ये तीन अशा एकूण 24 शेतकर्‍यांनी रावेर तालुक्यात मागील पाच वर्षात आत्महत्या केल्या.

विभागीय आयुक्तांची अशी उभारी योजना
‘उभारी’ ही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची ही महत्वाकाक्षी योजना असून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या दारा पर्यंत जाऊन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ यात मिळवून दिला जातो शिवाय लाभ मिळतो किंवा नाही याची पडताळणी करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होता. या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

सहा शेतकर्‍यांच्या कुटुंबा पर्यंतच पोहोचली ‘उभारी’
महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात आत्महत्या केलेल्या सहा शेतकर्‍यांच्या कुटुंबापर्यंतच उभारी योजना पोहोचली आहे. यामध्ये 2017 मधील तीन आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे कुटुंब आहे. 2018 मध्ये एक 2019 मध्ये एक 2020 मध्ये एक अश्या एकूण सहा शेतकर्‍यांपर्यंत शासनाची उभारी योजना पोहोचली आहे.