पाच वर्षानंतर उजळणार मामाजी टॉकीज रस्त्याचे भाग्य : लवकरच होणार कामाला सुरुवात

0

कंत्राटदारासह नगराध्यक्षांनी केली रस्त्याची पाहणी : दर्जेदार पद्धत्तीने होणार रस्त्याचे काम -नगराध्यक्ष

भुसावळ- राष्ट्रवादीच्या सत्तेनंतर भाजपाच्याही काळात दुर्लक्षित राहिलेल्या मामाजी टॉकीज रस्त्याचे भाग्य पाच वर्षानंतरही उजळले नसल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट होती. सत्ताधार्‍यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची घोषणा केली होती तर पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकण्यात येणार होता मात्र प्रत्यक्षात काम न झाल्याने सोशल मिडीयात सत्ताधार्‍यांवर चौफेर टिका होत होती मात्र दिलेल्या शब्दाची पूर्ती करण्याची ग्वाही नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिल्यानंतर गुरुवारी या रस्त्याची खाजगी कंत्राटदारासह पदाधिकार्‍यांनी पाहणी केली. प्रसंगी रस्त्याचे लेव्हलिंग (पातळी) मोजण्यात आली तर येत्या चार दिवसात प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. ‘दैनिक जनशक्ती’ने मामाजी टॉकीज रोडसह शहरातील अन्य रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेबाबत आवाज उठवून सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधले होते, हे देखील तितकेच खरे!

पाच वर्षानंतर उजळणार रस्त्याचे भाग्य
पालिका हद्दीतील मामाजी टॉकीज रस्त्याचे काम पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्यापासून म्हणजेच सन 2013 पासून रखडले होते तर नगरोत्थान योजनेतून हा रस्ता मंजूर झाला होता मात्र नंतर ही योजनाच रद्द झाल्याने काम रखडले होते. पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांनी या रस्त्याचे काम मार्गी लावू, असे आश्वासन देत मतांचा जोगवाही मागितला तर निवडणुकीला दीड वर्ष उलटूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. अमृत योजनेच्या पाईप लाईनचे कारण पुढे करून कामाला ब्रेक लागला होता मात्र आता अमृतच्या पाईप लाइनचे कामदेखील पूर्ण झाल्याने रस्त्याच्या कामाला मुहूर्त गवसला आहे. प्रत्यक्षात चार दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

पदाधिकार्‍यांनी केली पाहणी
गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, मुकेश पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे आदींनी मामाजी टॉकीज रस्त्याला भेट देऊन पाहणी केली. प्रसंगी कंत्राटदाराने रस्त्याची लेव्हलिंगची मोजणीदेखील केली. दरम्यान, लोकप्रतिनिधींकडून रस्त्याची पाहणी झाल्याने या भागातून प्रवास करणार्‍या वाहनधारकांनी समाधान व्यक्त करून लवकरच कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.