पाच वर्षापासून पिक विमा कंपन्यांकडून लूट सुरु असतांना शिवसेना कोठे होती?; धनंजय मुंडेंचा सवाल

0

मुंबई: पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणूकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक विमा कंपन्यांची कार्यालये बंद करू असा इशारा दिला आहे , त्याचा समाचार घेतांना गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. शिवसेनेला मात्र निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका मुंडे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आघाडीचा असेल
भाजपा शिवसेनेत मुख्यमंत्री कोणाचा यावरून जुगलबंदी रंगली असतांना मुख्यमंत्री ना सेनेचा असेल ना भाजपाचा असेल मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस महाआघाडीचा असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. ज्यांनी शिवरायांचे नाव घेऊन मागील निवडणूका जिंकल्या, त्यांना 5 वर्षात शिवस्मारक उभारता आले नाही, त्याच्या कामात गैरव्यवहार केला, छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी योजना आणून फसवणूक केली तेच आता पुन्हा शिवशाही सरकार म्हणून शिवरायांच्या नावाचा निवडणूकिसाठी वापर करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निदर्शने करणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आल्याचा त्यांनी निषेध करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल केला.