एरंडोल (रतिलाल पाटील)। माठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याने नदीपात्र खड्डेमय झाले आहे. हे खड्डे जीवावर बेतणारे ठरत आहे. एरंडोल येथील अंजनी नदीच्या पात्रात पडलेल्या खड्यांमध्ये पाच शाळकरी मुले दाबले गेल होते. मात्र जवळच क्रिकेट खेळणार्या युवकांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत इतरांच्या मदतीने पाच बालकांचे प्राण वाचविले. उत्राण रस्त्यावरील आदिवासी भिल्ल समाजातील पूजा विनोद भिल (10), लक्ष्मी विनोद भिल (7), आरती विनोद भिल (6), अंजनी विजय मालचे (7), यशोदा समा सोनवणे (7) पवन भिल (10) हे बालके गुरुवारी 29 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर भोई गल्लीमार्गे अंजनी नदीच्या पात्रातून घरी जात होते. घरी जात असतांना नदीच्या पात्रातून असलेली पायवाट अचानक खचल्यामुळे सर्व बालके खाली पडून वाळूच्या खाली दाबले गेले.
तीन संख्ख्या बहिणींचा समावेश
या घटनेत सुदैवाने कोणत्याही बालकाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र मुल या घटनेने भेदरल्याने त्यांना मानसिक धक्का बसला आहे. पूजा, लक्ष्मी व आरती या तिन्ही सख्ख्या बहिणी असून त्यांचे वडील रोजगारानिमित्त बाहेगावी गेले असतात. आर्थिक स्थिती अत्यंत गरिबीची असून मजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असतात. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी बचावकार्य सुरु करु खड्डयातील वाळू व माती काढून सर्व दाबल्या गेलेल्या बालकांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी सर्व बालके अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होते.
पवनने मदतीसाठी बोलावले
मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्यात आल्याने अंजनी नदी पात्रात जीवघेणे खड्डे तयार झाले आहे. पायवाट खचल्यामुळे तयार झालेल्या खड्यामध्ये विद्यार्थी पडले. यात आरती भिल ही अर्धवट दाबली गेली होती. बाकीचे मुल देखील वाळू खाली दाबल्या गेले होते. त्यातील पवन भिल हा दहा वर्षीय मुलगा मागे असल्यामुळे तो बाहेरच राहिला. पवनने हाक मारुन शेजारी क्रिकेट खेळणार्या मुलांच्या लक्षात ही घटना आणून दिली.
प्रशासनाच्या कारवाईची गरज
जिल्ह्याभरात अवैध वाळु उपसाचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाचे वाळु माफीयांरील पकड सैल झाल्याची स्थिती दिसून येत आहे. प्रशासनाने वाळु उपसावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पावसाळा सुरु असून नदीपात्रातील खड्यांमध्ये पाणी आल्यास खड्यांचा अंदाज न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. मागील वर्षी जिल्ह्यात अशी घटना घडली असल्याने प्रशासनाने सजग रहायला हवे अशी मागणी होत आहे.