तळेगाव : संपर्क बालग्राम संस्थेच्या वतीने आज आयोजित केलेल्या भाजे लेणी ते लोहगड किल्ला या हेरिटेज वॉकमध्ये पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील पुरातन गड किल्ले व लेण्याच्या दर्शनासोबत महाराष्ट्राची संस्कृती व मराठमोळ्या मेजवानीचा आनंद मिळाला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते या वॉकला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. मिस इंडिया युनिर्व्हस नितु खोसला, सिने अभिनेत्री गिरिजा ओक, नेहा महाजन, हरिष पटेल, फत्तेचंद रांका, डॉ. ललित चोखानी, आयपीएस स्मिता पाटील, मावळचे सभापती गुलाब म्हाळसकर यांनी वॉकमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र परंपरेचे दर्शन
भाजे गावात आलेल्या प्रत्येकाचे ढोल ताश्यांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने स्वागत सुरु केले. पुढे महिला औक्षणांकरिता हातात आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या, शेजारीच महाराष्ट्रातील तलवारबाजी हा मर्दानी खेळ सुरु होता. भाजे लेणीच्या पायर्यांवर भिक्कू महाराजांचे दर्शन, थोडे पुढे येताच वासुदेव, जात्यावर दळण दळत असलेल्या महिला तर दुसरीकडे तुळशी वृदांवनासमोर फेर धरुन पारंपरिक गाणी म्हणणार्या महिला, त्यानंतर पोतराज व भजन करणारी वारकरी मंडळी, जागरण गोंधळ, महाराजांचा पोवाडा गाणारी शाहीर मंडळी, विसापुरच्या पायथ्याला शाळकरी मुलांची मल्लखांबाची प्रात्यक्षिके पाहायला मिळाली.
ग्रामीण पदार्थांचा आस्वाद
हेरिटेज वॉकचा समारोप महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणार्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. वॉक दरम्यान भाजलेले शेंगदाणे, उकडलेली मक्याची कणसे, वडापाव, भरलेली वांगी, पिठलं व चुलीवरील भाकरी, सोबत मिरचीचा ठेचा या ग्रामीण पदार्थांचा आस्वाद देखील सहभागी नागरिकांना घेता आला.