जळगाव । भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महानगरपालिका शाळेच्या सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी लिखित ’पासवर्ड सुंदर अक्षराचा’ हे पुस्तक सस्नेह भेट देण्यात येणार आहे. ही आगळी वेगळी संकल्पना महानगर जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे आणि भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आली. आमदार खडसेंच्या निवासस्थानी दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. दरवर्षी आमदार खडसेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी शालेय उपयोगी अशी संकल्पना राबविण्याचे ठरविण्यात आले. स्व.भवरलालजी जैन यांना अर्पण केलेल्या कृपा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आले. यावेळी आमदार भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महेश जोशी, नितीन गायकवाड, दत्तू जाधव, राजू मराठे, बापू ठाकरे, राहुल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.