धुळे : पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामीसह भाचीचा पाण्यात बुडाल्याने करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील नंदाणे गावालगत रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. सुंदरबाई समाधान होलार (21, रा.नंदाणे) व शिवानी आंबा होलार (7, रा.नागद, ता.चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत.
कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना
सुंदरबाई या भाचीला सोबत घेऊन रविवारी गावालगत असलेल्या पांझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या असता शिवानी पाय घसरून पाण्यात पडली. सुंदरबाईने शिवाणीला वाचवताना पाण्यात उडी घेत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र दोघीही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, जवळच्या शेतात गुरे चारत असलेल्या आबा भील याला तलावात दोन जण पाण्यात पडल्याचे दिसून आले. वस्ती जवळच असल्याने नातेवाईक व ग्रामस्थ जमा झाले. तत्काळ मामी-भाचीला गावकर्यांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढले. त्यांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले. दरम्यान, मयत सुंदनबाई या तीन महिन्यांच्या गर्भवती असल्याचे समजते. समाधान छगन होलार यांनी दिलेल्या खबरीवरुन सोनगीर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.