चाळीसगाव । येथील हिरापूर रोड स्थित ग्राम शक्ती फायनान्स कंपनीचा 27 वर्षीय तरुणाचा रविवार 23 जुलै 2017 रोजी तालुक्यातील पाटणादेवी येथील पितळखोरे जवळ असलेल्या धवलतीर्थ धबधबा कुंड्यात पडून सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली असून हा तरुण नांदेड जिल्ह्यातील असून वाढदिवसाच्या पार्टी साठी 10 मित्रांसमवेत त्या ठिकाणी गेला असल्याचे सांगण्यात आले. मृतदेह परिश्रामांनंतर सायंकाळी बाहेर काढला. याबाबत रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
वाढदिवस असल्याने मित्रांसोबत गेला फिरायला
योगेश भोरे (27) रा कुंडलवाडी, ता बिलोली जि नांदेड हा तरुण चाळीसगाव येथील हिरापूर रोड वरील ग्रामशक्ती फायनान्स मध्ये नोकरीस होता. 21 जुलै 2017 रोजी त्याचा वाढदिवस असल्याने त्या वाढदिवसानिमित्त व आज रविवारी सुटी असल्याने कामावरील जवळपास 10 मित्रांसमवेत चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी जंगलात असलेल्या पितळखोर्या जवळील धवलतीर्थ कुंड धबधब्या जवळ फिरावयास गेला होता. वरील धबधब्याच्या पाण्याच्या धारेखाली बसलेला असताना सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पाण्याचा प्रवाह जोरात आल्याने योगेश भोरे हा धवलतीर्थ कुंडात पडल्यामुळे त्याचे डोक्याला जबर मार लागून तो पाण्यातील कुंडात बुडाला.
परीश्रमानंतर सापडला मृतदेह
कुंडात खोल पाणी असल्यामुळे तो लवकर सापडला नाही. अखेर वनविभाग व पोलीस कर्मचार्यांना तेथे पाचारण करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहायक फौजदार संजय काळे, हवालदार दिलीप रोकडे, पोलीस नाईक दत्तात्रय महाजन, नितीन आमोदकर, वन विभागाचे कैलास राठोड, खडकी बु चे शकील खान, गोकुळ कोल्हे व पाटणा गावातील ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह सायंकाळी बाहेर काढण्यात आला.