चाळीसगाव। तालुक्यातील पाटणादेवी हे जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पाटणादेवी हे पर्यटन स्थळ हे निसर्गरम्य वातावरणाने नटलेले असल्याने पर्यटकांसाठी ते मोठे आकर्षण ठरते. दररोज शेकडो पर्यटक पाटणादेवीला भेट देत असतात. चाळीसगाव परिसरात जोरदार पाऊस झालेला असल्याने धबधबे वाहायला लागले आहे. हे पर्यटनस्थळ नदीच्या ठिकाणी येत असून या ठिकाणी जिवीत हानी घडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या कालावधीत पर्यटकांची व नागरीकांची जिवीत व मालमत्तेची हानी होऊ नये, शासकीय व खाजगी मालमत्तेची हानी होऊ नये, सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ नये, पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी तसेच कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत रहावी यासाठी पाटणादेवी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहे.
पर्यटकांनी ह्या गोष्टी टाळाव्यात
पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे, उघडया जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दर्याचे कठडे धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे, तसेच रहदारीच्या ठिकाणी परिणाम करणार्या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्या धोकादायक पाण्यात, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्याच्या वरील बाजुला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणार्या पाण्याच्या झोताखाली बसणे, धोकादायक स्थिती व जिवीतहानी होईल अशा धबधबे किंवा तलाव नदी याठिकाणी पाण्यात उतरणे, रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे, वाहनांची ने-आण करतांना बेदारकपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लास्टीकचे साहित्य उघडयवर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्या महिलांशी छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डी. जे. सिस्टीम वाजविणे, गाडीमधील स्पीकर वाजविणे व त्यामुळे ध्वनीप्रदुषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू, जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे, धरण, तलाव, धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहनाचे प्रवेश करणे यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.
1 किमी परिसरात प्रतिबंध
तालुक्यातील गौतळा औटम घाट अभयारण्यातील केदारकुंड व धवलतीर्थ धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पर्यटकांच्या जीवतेला धोका पोहोचू नये यासाठी उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी धरण, तलाव, धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 (1) (4) नुसार 22 ऑगस्ट ते 15 ऑक्टोंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.