पाटणादेवी येथे वनविभागाकडून भाविकांची लुट सुरु

0

चाळीसगाव। तालुक्यातील भाविकांचे प्राचिन काळाचे श्रध्दास्थान असलेले तिर्थक्षेत्र पाटणादेवी निवासीनी चंडीकामातेच्या दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी राज्यभरातून दररोज शेकडो भाविक येत असतात. परंतुभाविकांकडून वनविभाग पर्यटणाच्या करवसुलीच्या नावाखाली सर्रासपणे लुट करत आहे. 30 जुलै पासुन बोगस पावतीबुकाच्या आधारे तसेच कुठलेही अनुक्रमाक नसलेल्या पावत्या देऊन वेळप्रसंगी पावती बुक संपल्याचे कारणे पुढे करून विना पावती पैसे बळजबरीने अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने लुट केली जात असल्याचे दिसून येत आहे.

पावतीबुक नसल्याचे सांगून पैसे आकारणी
5 आँगस्ट रोजी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वनहक्क समितीच्या बैठकीत लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रारी केल्या त्यानंतर लगेचच वाहन शुल्क व प्रवेश शुल्क आकारणे तात्काळ बंद करण्याचे संबधीताना आदेश देऊनही या आदेशाला केराची टोपली दाखवून पुन्हा भाविकांची लुट होत असल्याचे दिसून येते. वाहन प्रवेश शुल्क आकारणीची पावती देऊन व पर्यटकांना धवलतिर्थ व केदारकुंड परिसरात जाण्यासाठी लाकडी बांबु लाऊन या ठिकाणी कैलास चव्हाण या रोजंदारी कर्मचारी नेमुन पर्यटकांकडून तिस रुपये आकारुन पावती बुक नसल्याचे सांगुन लुट केली जात आहे.

लुट थांबविण्याची मागणी
सदर रक्कम अधिकारी आपसात वाटप करुन घेण्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. संबधीत प्रकार वरिष्ट अधिकारी यांना सांगुनही सारवासारव करण्यात येऊन पुन्हा जोमाने सुरवात केली असुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार सुरु आहे. भाविकांची लुट थांबवावी अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चातर्फे निवेदनाने करण्यात आलेली आहे. निवेदनावर अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, ज्ञानेश्‍वर राठोड, समाधान ठाकरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.