पाटणा । येथील गांधी मैदानात लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’ महारॅलीत तमाम विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, जेडीयुचे शरद यादव यांनी या रॅलीत सहभाग घेतला. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोबाइलवरून भाषण केले. यात सर्व नेत्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.
भाजपची साथ नाहीच
या रॅलीनंतर झालेल्या सभेत राजद अध्यक्ष लालूप्रसान यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मी एकवेळ फासावर जाईन पण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपसोबत हातमिळवणी करणार नाही, असे वक्तव्य करत भाजपविरोधी रॅलीत आज लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर जनतेची फक्त दिशाभूलच केली असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.
दिग्गजांचे टिकास्त्र
पाटणा येथील रॅलीत विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. यात माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. अखिलेश यादव यांनी देशात ‘अच्छे दिन’ कुठे आले आहेत? असा सवाल पंतप्रधान मोदी यांना केला. तर शरद यादव यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मेळाव्यात आल्या नसल्या तरी त्यांनी मोबाईलवरून उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करत भाजपवर टीका केली.