पाटण । येथील जिल्हा परीषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा आनंदात पार पडला. अध्यक्षस्थानी जिप सदस्य ललिताताई देसले होत्या. तसेच उद्घाटक म्हणून पं.स.सदस्य नानाभाऊ सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प्रा.सुरेश देसले, सरपंच विशाल पवार, गटविकासाधिकारी मनिष पवार, बी.एस.बुवा, सी. जी.बोरसे ,शा.व्य.समिती अध्यक्ष नीताताई पाटील आदी उपस्थित होते. सजवलेल्या बैलगाडीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप
पाठ्यपुस्तके, गणवेश ,गुलाबपुष्प देऊन मान्यवरांनी मुलांचे स्वागत केले. मनिष पवार यांनी जि.प.शाळांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सुरेश देसले यांनीही जि.प. शाळांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन पाटण शाळेचे उदाहरण दिले. यानंतर ज्ञानरचनावादी शै. साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शेवटी सर्व मुलांना व उपस्थित मान्यवरांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. सुत्रसंचालन राजेंद्र शिंपी यांनी केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका योजना पवार , पाटील मॅडम, राजेंद्र शिंपी, आरती पवार यांनी कामकाज पाहिले.