पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिका पवना नदीवर रावेत, गहुंजे आणि शिवणे येथे बंधारा बांधण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. हे बंधारे पाटबंधारे विभागाने बांधावेत व पालिकेने खर्चाची पूर्तता करावी, अशा सूचना जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पालिकेला आणि पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.
शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्यानातून बंधा-याबाबत जलसंधारण राज्यमंत्री शिवतारे यांच्यासोबत पाटबंधारे विभाग आणि पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता एस.डी.चोपडे, कार्यकारी अभियंता शेलार साहेब, उपअभियंता मठकरी, पिंपरी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्य स्थिती 490 एमएलडी पाणी महापालिका रावेत बंधा-यातून उचलते. रावेत बंधारा हा शंभर वर्षापूर्वीचा असल्याकारणाने त्यांची आयुमर्यादा संपली आहे. या बंधा-यालगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महापालिकेने 2013 साली जलसंपदा विभागाकडे परवानगी मागीतली होती. परंतु, आजतागायत जलसंपदा विभागाने यास परवानगी दिली नव्हती, अशी माहिती दिली.