पाटबंधारे विभागाचा लाचखोर अभियंता धुळे एसीबीच्या जाळ्यात

धुळ्यात कारवाई : दोन लाख 20 हजारांची लाच भोवली

धुळे : बांधकाम व्यावसायीकाचे बिल काढून देण्यासाठी मदत केल्याने तसेच वरीष्ठांसोबत साईटची पाहणी करण्याच्या मोबदल्यात दोन लाख 20 हजारांची लाच मागणार्‍या लघू सिंचन विभागाचे शाखा अभियंता मधुकर भाऊराव पाटील (48, पाटबंधारे पाटशाखा, पिंपळनेर वर्ग-2, पाटबंधारे उपविभाग साक्री, रा.प्लॉट क्र, 24 इंद्रप्रस्थ कॉलनी, वाडीभोकर रोड, धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या कार्यालयात स्वीकारली लाच
36 वर्षीय तक्रारदार यांची बांधकाम कंपनी असून त्यांनी रंगावली मध्यम प्रकल्प, ता.नवापूर, जि.नंदुरबार येथे धरणाच्या बाहेरील संरक्षक भिंत व पुलाचे बांधकामाचे कंत्राट घेतल्यानंतर काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल काढून देण्यासाठी वरीष्ठांना भेटून मदत केली तसेच वरीष्ठांसोबत काम सुरू असलेल्या साईटची पहाणी करून मदत केल्याच्या मोबदल्यात संशयीत आरोपी मधुकर पाटील यांनी बुधवारी लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या संदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. तक्रारदार यांच्या बाफना कॉम्प्लेक्समधील कार्यालयात सापळा रचण्यात आला. पाटील यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यालयात येवून लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रकाश झोडगे, निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, जयवंत साळवे, शरद कटके, कैलास जोहरे, राजन कदम, पुरुषोत्तम सोनवणे, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, भूषण शेटे, संतोष पावरा, संदीप कदम, महेश मोरे, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.