भुसावळ : मुंबईहून पाटलीपूत्रकडे निघालेल्या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे वाघळी रेल्वे स्थानकाजवळ एस- 5-6 डब्याला जोडलेले कप्लिगं सुटल्याने गाडी इंजिनापासून पुढील पाच डबे घेवून सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत धावली तर नवीन तंत्रज्ञानामुळे प्रेशर कमी होताच गाडीची चाके रूळावर घासली जावून गाडी स्वयंचलित यंत्रणेमुळे थांबली. या प्रकारानंतर प्रवाशांनी आरडा-ओरड करीत काहीतरी विपरीत घडले म्हणून पटापट बोगीबाहेर उड्या घेतल्या. दरम्यान, सुदैवाने डाऊन मार्गावरून एकही गाडी यावेळेत न आल्याने मोठी अप्रिय घटना टळली तर क्षणभर प्रवाशांच्या जीवाचा थरकाप उडाला. सुमारे तासाभरात कप्लिगं पूर्ववत केल्यानंतर गाडी भुसावळकडील प्रवासासाठी रवाना झाली.
आधीच नऊ तास विलंब त्यात घडले विपरीत
डाऊन 12141 एलटीटी-पाटलीपुत्र एक्सप्रेस आधीच सुमारे नऊ तास विलंबाने धावत असल्याने प्रवासी त्रस्त असताना मंगळवारी दुपारी 12.30 वाजता गाडीने चाळीसगाव पास केल्यानंतर एस- 5-6 डब्याची कप्लिगं निखळल्याने इंजिनापासून पाच डबे घेवून गाडी सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत धावून थांबली. या प्रकारानंतर प्रवाशांनी आरडा-ओरड सुरू केला तर एव्हाना लोकोपायलट व गार्डने एकमेकांशी संवाद साधल्यानंतर गाडी पुन्हा माघारी नेण्यात आली. यावेळ चाळीसगावातील रेल्वे अधिकारी व कर्मचार्यांरी तसेच सुरक्षा यंत्रणांनी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. तासाभरात धडकल्याने कप्लिगं पूर्ववत केल्यानंतर पुढील प्रवासासाठी ही गाडी रवाना झाली.
अपघात होणे अशक्य : शिवराज मानसपुरे
डाऊन पाटलीपूत्र एक्स्प्रेसची केवळ कपलिंग निसटल्याने 25 मिनिटे गाडीचा खोळंबा झाला. नवीन तंत्रज्ञानामुळे असे प्रकार घडल्यानंतर लोकोपायलटला इंजिनात तर गार्डला ब्रेक व्हॅनमध्ये मीटरमध्ये इंडिकेट होते शिवाय आपोआप गाडीत ब्रेक सिस्टीम अॅक्टीव्हेट होवून गाडी काही अंतरावर थांबते त्यामुळे प्रवाशांना घाबरण्यासारखे काहीही नाही. स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे मागून अचानक गाडी येणे शक्यच नाही त्यामुळे अपघात होण्याची पूर्वीसारखी भीती नवीन तंत्रज्ञानामुळे आता राहिलेली नाही, असे सिनी.डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.