पाटसजवळ बारामती फाट्यावर अपघात

0

यवत । समोरून येणार्‍या वाहनासोबत होणारा अपघात टाळण्याचा प्रयत्न ट्रक चालकाने केला असता ट्रकच पलटी झाल्याची घटना पाटस येथे घडली आहे. या अपघातात ट्रकमधील चालक आणि इतर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. पाटसवरून बारामतीकडे आणि बारामती बाजूने अनेक वाहने बारामती फाट्यावरून महामार्गावर येत असतात. कुरकुंभ बाजूने येणारी सर्व वाहने घाटामधून वेगाने पाटस बाजूला येत असतात. यामुळे या ठिकाणी तीन वर्षामध्ये छोटे-मोठे 85 अपघात झाल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत. या अपघातांमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 जणांना जीव गमवावा लागला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याबाबत पाटसवासीयांनी टोल प्रशासनला लेखी निवेदन दिले आहे.

दरम्यान महामार्गावर गतीरोधक बसवणे चुकीचे आहे. बारामती फाट्यावर सर्वात जास्त अपघात होत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अनेक निवेदने देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून मागण्या मान्य झाल्या की, अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, पाटस टोल प्रशासनचे युनुस पानसरे यांनी सांगितले. संबंधित अधिकार्‍यांनी योग्य दखल घेतली नाही तर. रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.