दौंड। पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल प्लाझावर स्थानिक बेरोजगार तरुणांना कामासाठी प्राधान्य देण्यात यावे. यासाठी भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपात निवेदन टोलनाका प्रशासनाचे एस. घोष यांना दिले.
पुणे-सोलापूर महामार्गावर यवत ते इंदापूर पर्यंतच्या महामार्गावर टाटा कंपनीकडून गेली चार वर्ष टोल वसुली सुरू आहे. टोल वसुलीसाठी पाटस आणि इंदापूर येथे टोल नाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. टोल वसुली सुरू झाली तेव्हा सुमारे 200 कामगार कामावर रुजू करण्यात आले होते, तर चालू वर्षी म्हणजे 2018 या वर्षी आकडा पाहत कामगार संख्या निम्म्याने कमी करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक कामगारांची संख्या लक्षणीय कमी आहे. स्थानिक मुलांना काही कारणास्तव टोल प्रशासनाने कमी केले आहे, अशी माहिती समोर येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दररोज चार लेन बंद
टोल प्लाझावरील अनेक विभागामध्ये जागा रिक्त आहेत. याचा परिणाम टोलवर झालेला आहे. टोलच्या दर दिवशी तीन-चार लेन बंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. या सुरक्षारक्षकांमधील काही कामगारांना सुरेक्षेचे काम न देता टोल प्रशासनाकडून स्वागत कक्ष आणि वाहनांचे पैसे जमा करण्याचे काम दिले जात आहे.
कामगारांची हेळसांड
टोल प्रशासनाकडून तडजोड करून कामगारांची हेळसांड केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांकडून स्थानिक तरुणांना डावलले जात आहे. यावेळी इंदापूर येथून काही कामगारांना पाटस टोलवर कामावर घेण्यात आले आहे. या मुलांना कामावरून काढून स्थानिक तरुणांना 15 दिवसाच्या आत कामावर घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रामचंद्र भागवत, भानुदास भंडलकर, शिवाजी भागवत, संदीप वाबळे, अनिल जमादार, अमोल भागवत, रजत भोसले, सागर भागवत, मदन कुबेर, अभिषेक कुदळे, भाऊ माखर आदी उपस्थित होते.