पाटील इस्टेट झोपडपट्टीचे पुनर्वसन

0

सीओईपीने घेतला पुढाकार : स्कीम राबविण्याचा निर्णय

पुणे : सीओईपीच्या जागेवर असलेल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार असून, सीओईपीनेच त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाची स्कीम करण्याची तयारी दर्शवली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीतील बुधवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे झोपडपट्टीवासियांचा प्रश्‍न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

झोपडपट्टीची जागा ही सीओईपीच्या मालकीची आहे. ही जागा पाच एकर असून, यावर 1100 झोपड्या आहेत. तसेच येथील लोकसंख्याही सुमारे 7 हजार आहे. या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन स्कीम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला सीओईपीने आक्षेप घेतला होता. ही त्यांची खासगी जागा असल्याने त्यांनी हा निर्णय घेत न्यायालयाचे दार ठोठावले होते.

प्रस्ताव तंत्रशिक्षण विभागाकडे

दरम्यान, खासगी जागेवर झालेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी विकासकाला बेनिफिट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वत:च विकासक म्हणून पुनर्वसनाची योजना करण्याला सीओईपी तयार झाली आहे. त्यांनी त्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून, त्यांचा हा प्रस्ताव तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवला आहे. तेथे परवानगी मिळाल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणही त्याला तत्काळ मंजुरी देणारअसल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

विरोधाची शक्यता कमी

प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया करून, येथील काम सुरू होण्याची शक्यता आहे. या झोपडपट्टीमध्ये याआधीही आगीची घटना घडली आहे. तसेच शहरातील अन्य झोपडपट्ट्यांमध्येही वारंवार अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एसआरएच्या स्कीम लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र त्यासाठी झोपडपट्टीवासियांनीही पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मत यावेळी अधिकार्‍यांनी व्यक्त केले. पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या विषयात सीओईपीच यामध्ये स्कीम करणार असल्याने फारसा विरोध होणार नाही, अशी आशाही अधिकार्‍यांनी व्यक्त केली.