पाठलाग केल्याने चोरटा मोटारसायकल सोडून पसार

0

जळगाव । शहरातील सेंट्रल फुले मार्केट येथून एकाची मोटारसायकल चोरून चोरट्याने पोबारा केला. परंतू, मोटारसायकल मालक आपला पाठलाग करत असल्याचे पाहून चोरट्याने इंद्रप्रस्थनगरात मोटारसायकल फेकून तेथून पोबारा केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, रविवारी सकाळी इंद्रप्रस्थनगरातील नागरिकांनी बेवारस मोटारसायकल सापडल्याची माहिती पोलिसांना दिल्यावर शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून मोटारसायकल ताब्यात घेतली. यानंतर मोटारसायकल मालकाचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर एका हॉकर्सची ती मोटारसायकल असल्याची माहिती पोलिसांमसोर आली.

फुले मार्केट येथून चोरली मोटारसायकल
सचिन चंद्रकांत जोशी हे हॉकर्स असून शनिवारी रात्री 12.30 वाजता सेंट्रेल फुले मार्केट येथील एका व्यापार्‍याकडे ते एम.एच.19.बीटी.6070 या मोटारसायकलने आले होते. परंतू, मार्केटमधील अंधाराचा फायदा घेत एका चोरट्याने जोशी यांची मोटारसायकल चोरून नेली. कुणीतरी जोशी यांची मोटारसायकल चोरून नेत असल्याचे व्यापार्‍यास दिसल्यानंतर त्यांनी जोशी यांना कळविले. त्यानंतर त्यांनी स्वत:ची मोटारसायकल काढून चोरट्याचा पाठलाग केला. फुले मार्केट ते जिल्हा परिषदेपर्यंत व्यापारीने पाठलाग केला. परंतू, चोरटा अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला.

मोटारसायकल मालक आपला पाठलाग करीत असल्याचा संशयाने चोरट्याने चक्क इंद्रप्रस्थनगरात मोटारसायकल फेकून देवून तेथून पोबारा केला. सकाळी इंद्रप्रस्थनगरातील रहिवाश्यांना बेवारस मोटारसायकल पडलेली असल्याची आढळून आल्याने त्यांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलिस ठाण्याचे प्रितमसिंग पाटील तसेच डिबी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून मोटारसायकल ताब्यात घेवून मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली. यातच शनिवारी मध्यरात्री हॉकर्स सचिन जोशी यांची मोटारसायकल चोरीला गेल्याचे पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी जोशी यांना संपर्क साधून मोटारसायकल मिळाल्याचे सांगितले.